एखाद्या गल्लीत, नाक्यावर टपरीवर चहा विकणारा कोणी कोट्यवधी रुपये कमावू शकतो यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे. पण एमबीए करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रफुल्ल बिल्लौरने हे खरं ठरवलं आहे. प्रफुल्लला आता संपूर्ण देशभरात एमबीए चायवाला नावाने ओळखलं जातं. या चहावाल्याची गोष्ट अतिशय खास आहे. सोशल मीडियावर आज त्याचे अनेक चाहते असून अनेकजण त्याला फॉलो करतात. आज या एमबीए चहावाल्याचा कोट्यवधींचा टर्नओव्हर आहे आणि विदेशात याच्या फ्रेंचाइजीही सुरू होत आहेत.
प्रफुल्ल बिल्लौरने २०१७ मध्ये केवळ ८००० रुपयांत एमबीए चायवाला वेंचरची सुरुवात केली होती. तीन वर्षांच्या स्ट्रगलनंतर तो २०२० मध्ये व्हायरल झाला आणि एका रात्रीत त्याचं आयुष्यचं बदललं. केवळ मेहनतीच्या जोरावर आज त्याचे देशभरात १०० हून अधिक आउटलेट्स आहेत. आता तो अमेरिकेतही आउटलेट सुरू करण्याच्या तयारीत आहे. प्रफुल्ल आज कोट्यवधींचा व्यवसाय करतो, पण त्याचा साधेपणा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्याने नुकतीच ९० लाखांची लक्झरी कार मर्सिडिज बेंज जीएलई ३०० डी खरेदी केली आहे.
प्रफ्फुलने आपल्या यशाबाबत बोलताना सांगितलं, की भारतात संधी मिळत नाहीत हे बोलू शकत नाही, आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह राहून काम करायला हवं. भारतात अनेक संधी आहेत, तसंच अनेक गोष्टीही आहेत. भारतात यशाचा अर्थ पैसे कमावण्यासह तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्यही उत्तम राहणं असा आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट करताना त्याची लाज बाळगू नका. समाजातील सर्व लोकांना तुम्ही कसे यशस्वी होऊ शकता, हे दाखवून द्या.
मजा-मस्ती, गाड्यांमधून फिरणं, मद्यपान करणं, लग्नामध्ये नाचणं…तरुण अशा अनेक गोष्टींमध्ये आपली संपूर्ण ताकद घालवतात, जिथून कोणतेही रिटर्न्स मिळत नाहीत. यशस्वी होण्यासाठी आपल्याला वेळेचा सदुपयोग करणं गरजेचं आहे. कधी-कधी मोठ्या यशासाठी लहान भांडणं हरावी लागली तरी चालतात असंही तो म्हणाला.