एस.टी. बस थांबत नसल्याच्या कारणावरून निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा येथे विद्यार्थ्यांनी बस अडवून दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. शुक्रवार दि.१८ नोव्हेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास उमरगा हाडगा येथील विद्यार्थी शाळा, महाविद्यालयास जाण्यासाठी बस थांब्यावर थांबले होते. प्रवाशांची गर्दी असल्याने व गाडीत जागा नसल्याने बस थांबत नव्हती. शाळा- महाविद्यालयास जाण्यास उशीर , दररोज त्रास व हेळसांड होत असल्याने विद्यार्थी आक्रमक होत बस आडवली.
दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून विद्यार्थ्यांना पाठिंबा देत गावकरी आंदोलनात सहभागी झाले.. सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत उमरगा येथील गावकरी व विद्यार्थ्यांनी तीन एसटी बस अडवून धरत रास्ता रोको आंदोलन केले. बस चालक -वाहक व विद्यार्थी-गावकरी यांच्यात वादावादी सुरू झाल्याने तणाव निर्माण झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच निलंगा एस.टी.डेपोचे अधिकारी व पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकारी व एसटीच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढल्यानंतर तणाव निवळला. यापूर्वी विद्यार्थ्यांच्या प्रश्ना संदर्भात भाजप विद्यार्थी आघाडीचे तालुका अध्यक्ष नयन माने यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाला निवेदन देण्यात आले होते.
दररोज या मुलांना शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यापुढे विद्यार्थ्यांच्या जाण्या- येण्याची व्यवस्था नाही झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला. याप्रसंगी गावातील प्रमुख गावचे सरपंच अमोल बिराजदार,माजी पं. स. सदस्य विलास लाभे, तंटामुक्त अध्यक्ष जगदिश लाभे, भाजप विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष नयन माने ,शिवाजी दिवे, बालाजी दिवे, शाहूंराज लाभे, माधव वाडीकर,रमेश लाभे हे उपस्थित होते. पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळल्याने कोणताही अनुचित प्रकार घडले नाही.