मोहर्ली वनपरिक्षेत्रातील मुधोली नियतक्षेत्रात शेतात काम करीत असतांना वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
भद्रावती तालुक्यातील टेकाडी येथील शेतशिवारात लक्ष्मीबाई रामराव कन्नाके (६०) ही महिला शेतीचे काम करीत होती. त्यावेळी अचानक त्यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी वनपरिक्षेत्राधिकारी (प्रादेशिक) संतोष थिपे यांच्यासह वनविभागाचे – पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले.
पंचनामा झाल्यावर मृतकाचे शवविच्छेदन करण्याकरता भद्रावती ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मृतकाचा मुलगा काशिनाथ रामराव कन्नाके याला घटनास्थळीच तात्काळ मदत म्हणून पन्नास हजारांची मदत देण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. सदर परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आलेले असून गावकऱ्यांना शेतीचे काम करीत असताना वन्यप्राण्यांपासून सावध राहण्याच्या सूचना देऊन जनजागृती करण्यात येत असल्याची पुष्टी सूत्रांनी जोडली.