जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे आज, सोमवारी सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या परिसरात सुरू असलेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा देखील सहभाग आहे.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील लारो-परिगाम भागातील घरांमध्ये दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसरात शोध मोहिम हाती घेतली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यामध्ये आज, सोमवारी सकाळी 2 दहशतवादी ठार झालेत. यामध्ये लश्कर-ए-तोयबाच्या कमांडरचाही समावेश आहे. याठिकाणी सुरक्षा दलांची शोध मोहिम सुरू असून लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जोतोय. यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी सुरक्षा दलांनी पूंछ जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यादरम्यान सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका टॉप कमांडरचा खात्माही केला होता. कमांडरच्या मृतदेहा मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आली होती. तर त्याच्या अंगरक्षकाचा मृतदेह मिळू शकलेला नाही आहे.
















