मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहिवासी असलेले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2007 ची सरळसेवा परीक्षा देवून उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झालेले श्री. विकास गजरे हे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर १ जून २०२३ पासून कार्यरत आहेत. मुळातच व्यायामाची आवड असलेले जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. विकास गजरे हे आता “आयर्न मॅन” अर्थात “लोहपुरुष” म्हणून ओळखले जाणार आहेत.
कोल्हापूर येथील डेक्कन स्पोर्टस् क्लब तर्फे आयोजित लोहपुरूष Triathlon या स्पर्धेत श्री. गजरे हे इतर 99 स्पर्धकांसह मोठ्या जिद्दीने उतरले होते. ही स्पर्धा तीन टप्प्यात आयोजित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरच्या प्रसिध्द राजाराम तलावात १.९ किलोमीटर पोहणे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लगेचच कोल्हापूर-बॅंगलोर महामार्गावर ९० किलोमीटर सायकलिंग आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ३.२१ किलोमीटर (अर्ध मॅरेथॉन) पूर्ण करणे, अशी ही स्पर्धा होणार होती. स्पर्धा पूर्ण करण्यासाठी निर्धारीत वेळ १० तास इतकी होती. ही स्पर्धा सकाळी ६.३० वाजता सुरू झाली आणि श्री. गजरे यांनी दुपारी २.५५ ला ही स्पर्धा पूर्ण केली. अशा प्रकारे श्री.गजरे यांनी ही स्पर्धा ८ तास २५ मिनिटात यशस्वीपणे पूर्ण केली अन् पटकाविला “आयर्न मॅन” अर्थात “लोहपुरुष” किताब..!
यापूर्वी श्री. गजरे यांनी ९० किलोमीटर अंतर १२ तासात पूण्र करणे, ही अट असलेली जगातील सर्वात कठीण व जुनी मॅरेथॉन ऑगस्ट २०२२ मध्ये पू्र्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील स्पर्धा पूर्ण करण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांनी सरावासाठी रोज सकाळी ५-७ या दरम्यानचा किमान २ तास वेळ दिला. यामध्ये त्यांनी सायकल चालविणे, पोहणे व धावणे या तिन्ही खेळांचा सातत्याने सराव केला. यासोबतच खाण्यापिणाच्या सवयींवर बारकाईने लक्ष दिले. लवकर झोपणे लवकर उठणे, हा मंत्र त्यांनी कटाक्षाने प्रत्यक्ष कृतीत आणला.
या यशाबद्दल जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. गजरे यांनी इतरांबरोबरच विशेष करुन शासकीय अधिकाऱ्यांसाठी “आरोग्य हीच खरी संपत्ती” असल्याचा संदेश दिला असून शासकीय अधिकाऱ्यांनी व्यायामासाठी वेळ जरुर काढावा, असे आवाहन केले आहे.