गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील पोलीस भरती रखडली होती. त्यामुळे सैन्य दलात किंवा पोलीस दलात आपलं नशीब आजमावणारी तरुणाई आस लावून बसली होती. त्यामुळे अखेर पोलीस भरती जाहीर झाल्याने तरुणाईला मोठा आनंद झाला होता. नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष या पोलीस भरतीला सुरुवात झाली होती. आजपासून यामधील शारीरिक आणि मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणचे तरुण गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस भरतीचा सराव करत होते. त्यामुळे अखेर त्यांच्या सरावाची परीक्षा आज होत आहे. नाशिकच्या ग्रामीण पोलीस दलाच्या आडगाव येथील मैदानावर ही शारीरिक चाचणी होत आहे. यामध्ये मैदानी चाचणी देखील होत आहे. त्यासाठी पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी भरतीसाठी प्रवेशपत्र मिळालेल्या तरुणाईला विशेष आवाहन केले होते.
सुरुवातीला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे अनेक तरुणांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. राज्यभरातून जवळपास चौदा हजार जागांसाठी अठरा लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते, त्यानुसार नाशिकमध्ये 179 जागांसाठी भरती होत आहे. नाशिकच्या ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई पदासाठी 164 तर चालक पदासाठी 15 जागांसाठी भरती होत आहे. पहाटेसहाला ज्याना प्रवेश पत्र मिळाले आहे त्यांनी सहा वाजता हजर राहण्याचे आवाहन केले होते, त्यात मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रती घेऊन उपस्थित राहण्याच्या सूचना होत्या.

















