बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत असणा-या क्रीडा उप विभागाद्वारे चेंबूर येथील ‘कलेक्टर कॉलनी’त दि. २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान अंतिम बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आल्या. शारीरिक शिक्षण माध्यमिक विभागाच्या या अंतिम बॉक्सिंग स्पर्धेत एकूण ६० शाळांतून ५४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत या स्पर्धा घेण्यात आल्या. तीन वयोगटातील ११ वजनी गटात पार पडलेल्या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, सह आयुक्त (शिक्षण) श्री. गंगाथरण डी. यांच्या निर्देशांनुसार या स्पर्धा पार पडल्या. शालेय शिक्षणासह विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग सतत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करीत असतो. चेंबूर येथील ‘कलेक्टर कॉलनी’त पार पडलेल्या या स्पर्धेतही खेळाडूंनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेत चिकाटी आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले.
या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक श्री. सुनीलदत्त माने यांच्या हस्ते करण्यात आले. तर छत्रपती पुरस्कार विजेते श्री. सौरव लेनेकर आणि राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू श्री. जयदीप भिवंडकर यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना शिक्षणधिकारी श्री. राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. राजू तडवी यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हे पर्यवेक्षक श्री अनिल सनेर यांनी केले. सदर स्पर्धेला पर्यवेक्षक श्री. लवटे, तसेच श्री. राजेश गाडगे व सर्व कनिष्ठ पर्यवेक्षक उपस्थित होते.