भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार २११- खडकवासला विधानसभा मतदासंघातील मतदार यादी पडताळणीचे काम सुरु असून नागरिकांनी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांना सहकार्य करुन मोहीमेत सहभागी व्हावे, असे आवाहन हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांनी केले आहे.उपविभागीय अधिकारी श्री. आसवले यांनी तहसीलदार किरण सुरवसे यांच्या समवेत खडकवासला मतदारसंघातील विविध भागात भेटी देऊन कामाची पाहणी केली.
खडकवासला, कोथरूड, खेडशिवापूर या महसूल मंडळात मतदार यादी पडताळणीच्या कामांचा वेग वाढविण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले. याबाबत सहा मतदार नोंदणी अधिकारी यांनी बी.एल.ओ, पोलीस पाटील, कोतवाल यांची बैठक घेऊन घरोघरी पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याकामात दिरंगाई अथवा दुर्लक्ष करणाऱ्या बी.एल.ओ विरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उपविभागीय अधिकारी श्री. आसवले यांनी दिला आहे.