महापालिकेत गेल्या दीड वर्षापासून प्रशासकराज असताना शहरातील समस्यां सोडविण्यात उशीर होत आहे. यावर आज महापालिकेत खासदार सुप्रिया सुळे यांनी नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या संदर्भात आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे बैठक घेतली.
त्यानंतर आमदार भीमराव तापकीर, अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या शिष्टमंडळाने स्वतंत्रपणे आयुक्तांची भेट घेत समस्या मांडल्या. त्यामुळे महापालिकेत आज नागरी समस्यांवरून राजकीय कुरघोडी दिसून आली.खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांवर आयुक्तांकडे बैठक घेतली. त्यामध्ये पाणी टंचाई, टँकर माफियांचा उच्छाद, समान पाणी पुरवठा योजनेतील त्रुटी, खराब झालेले रस्ते, विद्युत यासंदर्भातील तक्रारी आयुक्तांकडे मांडून या समस्या लवकर सोडविण्यास सांगितले.