नवेदर लोणवीवाडी (ता. राजापूर) येथे सुगंधा सदाशिव बावकर यांच्या राहत्या घरालगत रचून ठेवलेल्या लाकूड सामानाच्या खाली मरण पावलेला बिबट्या रात्री आढळून आला.बिबट्याचा उपासमारीने सुमारे तीन – चार दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबत वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोनवीवाडी येथे मृत बिबट्या सापडल्याची माहिती पोलीस पाटीलांमार्फत राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे आणि सहकार्यांना मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत दिसून आला.
बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन राजापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून घेतली. बिबट्याचा मृत्यू उपासमारीने झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिबट्याचा मृत्यू ३ ते ४ दिवसांपूर्वी झाल्याने त्याचे शरीर कुजलेले अवस्थेत होते. त्यामुळे सहाय्यक वनसंरक्षकांच्या समक्ष त्याचे जागेवर दहन करण्यात आले.