अंजनगाव सुर्जी येथे युवा स्वाभिमान पक्षातर्फे आयोजित दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून अमरावतीकडे निघालेल्या आमदार राणा यांना उद्धव ठाकरे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महेंद्र दीपटे यांनी रोखून त्यांच्याशी वादावादी केल्यामुळे त्यांना राणा समर्थकांनी मारहाण केली. तर, शिवसैनिकांनीही राणांच्या कार्यकर्त्यावर हात साफ केल्याची घटना आज अंजनगावात घडली.
दोन्ही गटाने परस्परांविरुद्ध पोलिसात तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान आमदार रवी राणा यांच्यावर चाकू हल्ला झाल्याचे सांगण्यात येत असून स्वतः आमदार रवी राणा यांचे म्हणणे आहे. तथापि जिल्हा पोलीस अधीक्षक अधीक्षक अविनाश बारगळ यांनी मात्र चाकू हल्ल्याची बाब नाकारल्याचे कळते. आमदार रवी राणा यांनी या घटनेची माहिती देतांना माझ्यावर चाल करून आलेल्या ठाकरे गटाच्या महेंद्रदिपटे व ८ ते १० शिवसैनिकांनी विनाकारण वाद केला. दरम्यान महेंद्र दिपटे याने माझेवर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. सदर प्रकरणात दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून शिवसेना कार्यकर्ते महेंद्र दिपटे यांच्या तक्रारीवरून मंगेश कोकाटे, विठ्ठल ढोले, अजय देशमुख यांच्याविरुद्ध भादवि २९४,३२३,५०६, ३४ तर आमदार रवी राणा यांच्या स्वाभिमान पार्टीचे तसेच आमदार रवी राणा यांचे स्विय सहायक मंगेश यांच्या तक्रारीवरून महेंद्र दीपटे यांचे विरुद्ध भादवी २९४, ३२३, ५०६ अन्वये गुन्हे दाखल झाले असून पुढील तपास ठाणेदार दीपक वानखडे करीत आहेत.
युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने अंजनगाव सुर्जी येथे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सिने अभिनेत्री अमिषा पटेल, अभिनेते चंकी पांडे व विविध मान्यवर हजर होते. सदर कार्यक्रम आटोपल्या नंतर रवी राणा यांनी अंजनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावित जागेला भेट दिली. यावेळी नवीन बस स्थानक परिसरातील अग्रसेन चौकात उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख महेंद्र दिपटे यांच्याशी त्यांचा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, आमदार रवी राणा व त्यांच्या कार्यकर्त्यानी महेंद्र दिपटे यांना जबर मारहाण केल्याचे दिपटे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या बद्दल कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी अपशब्द वापरल्यावरून सदर वाद झाल्याचे समजते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून उद्धव ठाकरे गटाचे माजी शिवसेना तालुका प्रमुख महेंद्र दिपटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशन समोर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी जमा होऊन आरोप प्रत्यारोप सुरू होते.