राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी अनेक ठिकाणी एसटी बसेसची जाळपोळ केल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यत आल्या असून सार्वजनिक वाहतूक प्रभावित झालीय. तसेच राज्य परिवहन महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
यासंदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यातील एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोलापूर विभागातील सर्व एसटी आगाराची वाहतूक पूर्ण बंद आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या 70 हून अधिक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड याठिकाणी जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. याशिवाय छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी दुपारपासून बस सेवा ठप्प आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 1400 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 160 बसेस मध्यवर्ती बस स्थानकात उभ्या आहेत.त्यासोबतच पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक भागांतून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. एसटी बसेसची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये शंभरपेक्षा जास्त बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे बस सेवा ठप्प झाली आहे.
यासोबतच एसटी महामंडळाच्या ताफ्यात आलेल्या नवीन स्लीपर बसेस परत बोलवण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजी नगरहून निघणाऱ्या आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये येणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत. गेल्या 3-4 दिवसांपासून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद आहे. एसटी बसेसची मोडतोड, जाळपोळ झाल्याने अंदाजे 1 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विभागातील वाहतूक पूर्णतः, अथवा अंशतः बंद असल्याने दररोज एसटीचा दोन ते अडीच कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे. सोबतच प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.