आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारी लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेली असते. ती इंस्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. रिंकू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. मात्र आता तिने असं काहीतरी केलंय ज्यामुळे चाहते बुचकळ्यात पडले आहेत. सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा आहे. मात्र ती तिच्या नव्या चित्रपट किंवा फोटोमुळे चर्चेत नाहीये तर तिने तिचे सगळे फोटो डिलीट केल्यामुळे चर्चेत आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर केवळ दोनच फोटो दिसत आहेत. त्यामुळे चाहतेही बुचकळ्यात पडले आहेत.
सोशल मीडिया हा कलाकारांसाठी खूप मोठी गोष्ट मानली जाते. त्यात तुमचे इंस्टाग्राम फॉलोवर्स जास्त असतील तर तुम्हाला कामाच्या ऑफरही दिल्या जातात. असं असताना रिंकूने अचानक हा निर्णय का घेतला याबद्दल मोठा संभ्रम आहे. तिचे सोशल मीडियावर ७ लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. तिच्या प्रोफाइलवर केवळ दोन फोटो दिसत आहेत. त्यातील एक रक्षाबंधन स्पेशल पोस्ट आहे. ज्यात तिने तिच्या भावाबरोबरचे फोटो शेअर केलेत. ३० ऑगस्ट रोजी रिंकूने ही पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर वॉलवर दिसणारी दुसरी पोस्ट ही २६ जून २०२३ ची आहे. हा रील व्हिडीओ आहे. ‘खाली कमरा मेरी पहली कोशिश’ असं कॅप्शन रिंकूने त्या रीलला दिलं आहे. त्याचप्रमाणे रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मांजरीबरोबर मस्ती करत असतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.