रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला. २ हजाराच्या बँकेत जमा करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत देण्यात आली होती. दरम्यान, महावितरणने आज, बुधवार २७ सप्टेंबरपासून महावितरणच्या सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांवर २००० रुपयांच्या नोटा स्विकारल्या जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.भारतीय रिजर्व बँकेच्या अधिसूचनेनुसार रु. २००० ची नोट ३० सप्टेंबरपासून चलनातून बंद होत आहे. परंतु, बँकेच्या सुट्ट्या व अर्ध वार्षिक ताळेबंद सादर करण्यासाठी होणारी गर्दी व अडचणी पाहता महावितरण मुख्यालयाने सर्व क्षेत्रिय कार्यालयांना याबाबत लेखी आदेश दिले आहेत.
६ सप्टेंबरपर्यंत स्विकारलेल्या २ हजार मूल्याच्या सर्व नोटा कोणत्याही परिस्थितीत ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकेत जमा/भरणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार १ ऑगस्टपासून ५ हजार रुपयांपर्यंतचेच वीजबिल रोखीने भरता येते. सर्व प्रकारच्या वीजबिल भरण्यासाठी महावितरणची ऑनलाईन सोय २४ तास उपलब्ध आहे.ऑनलाईन वीजबिल भरल्याने ग्राहकाला ०.२५ टक्के आणि तत्पर देयक भरणा सवलतपोटी १ टक्का अशी एकूण १.२५ टक्के सूट तत्काळ मिळते. शिवाय विलंब आकार व व्याजातून सुटका होते. गैरसोय टाळण्यासाठी वीजबिलांचा घरबसल्या ऑनलाईन भरणा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.