सांगोला – मंगळवेढा – सोलापूर नवीन रेल्वे मार्गास मंजुरी द्यावी अशी मागणी संसदीय अधिवेशनात केली. याबाबत लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी सांगोला येथील प्रसिद्ध डाळिंब, मंगळवेढ्याची प्रसिद्ध ज्वारी तसेच सोलापूर अध्यात्मिक नगरीस जोडणारा सांगोला – मंगळवेढा – सोलापूर नवीन रेल्वे मार्ग झाल्यास जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळेल. त्यामुळे या नवीन रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करून मंजुरी देण्याबाबत संयुक्त बैठक बोलाविण्यात यावी अशी मागणी करीत खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडला.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्यात, बुधवारी लोकसभा सत्रात खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी हा प्रश्न मांडला. पुढे बोलताना ते म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला ते सोलापूर हे अंतर सुमारे 85 किलोमीटर आहे. सोलापूर ते सांगोला हा फक्त रस्ता उपलब्ध आहे. सांगोला सह सोलापूर जिल्ह्यात चांगल्या प्रतीचे डाळिंबाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सांगोल्यातील डाळिंब परदेशातही निर्यात केले जातात. यासोबतच मंगळवेढ्याची ज्वारी प्रसिद्ध आहे. मंगळवेढा ज्वारीला देशभरात मागणी आहे.
विशेषतः शेतकऱ्यांना शहराच्या बाजारपेठेशी जोडण्यासाठी आणि वाढत्या शहरीकरणाच्या दृष्टीने रेल्वे हे अत्यंत किफायतशीर वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे सांगोला – मंगळवेढा – सोलापूर रेल्वे मार्ग सुरू झाल्यास सांगोला व मंगळवेढा येथील शेतकऱ्यांना आपला माल सोलापूरलाच नव्हे तर देशातील इतर शहरातही पाठविण्याची सुविधा मिळू शकेल.
सांगोला व मंगळवेढा येथील अनेक शेतकरी व व्यावसायिकांनी सांगोला मंगळवेढा ते सोलापूर ही रेल्वे सेवा सुरू करावी, अशा मागण्यांचे निवेदन यापूर्वी दिले आहे. मंगळवेढा येथील आमदार, लोकप्रतिनिधी यांनीही रेल्वे मंत्रालयाला याबाबत मागणीचे निवेदन दिले आहे. सांगोला-मंगळवेढा-सोलापूर या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाबाबत मंगळवेढा सांगोला व सोलापूरचे लोकप्रतिनिधी व रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावून सांगोला-मंगळवेढा-सोलापूर रेल्वे मार्गाला मंजुरी द्यावी, अशी मागणी करीत या रेल्वे मार्गास लवकरात लवकर मंजुरी देण्याची मागणी खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींनी केली.
https://www.facebook.com/watch/?ref=search&v=467835595513834&external_log_id=cddce3fb-3c56-484e-a6ac-391ce096dba0&q=Dr%20Jaysiddheshwer%20Sjivachary%20Mahaswamiji
Post Views: 84