वारंवार आवाहन करून देखील वीज बिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून नाईलाजाने गेल्या २५ दिवसांमध्ये १ हजार ८६३ अकृषक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
सद्यस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३२३ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे ५० कोटी ६८ लाख रुपयांची थकबाकी आहे.दरम्यान, वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र रविवारी (दि. २७) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. विशेष म्हणजे एका महिन्याचे वीज बिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरू आहे.
पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने घरगुती २ लाख २७ हजार ३३७ ग्राहकांकडे ३९ कोटी १३ लाख रुपये, वाणिज्यिक १९ हजार २४७ ग्राहकांकडे ७ कोटी ७० लाख रुपये आणि औद्योगिक ३ हजार ७३९ ग्राहकांकडे ३ कोटी ८५ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे गेल्या २५ दिवसात १ हजार ८६३ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.