ऑगस्ट महिना संपत आला तरी जिल्ह्यातील सुमारे १२५० महसूल कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही. प्रशासनाने वेतन अनुदानाची मागणी शासनाकडे केले तरी अद्याप ते प्राप्त झालेले नाही. वेळेवर वेतन होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे बँक कर्जाचे हप्ते थकील होऊ लागल्याने खाते एनपीएत जात आहेत. शासनाने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत करावे, अशी मागणी महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी केली आहे.
जिल्ह्यातील तहसील व प्रांत कार्यालय व इतर विविध शाखेत सुमारे १२५० कर्मचारी कार्यरत आहेत. जुलै महिन्याचे वेतन १ ऑगस्ट रोजी होणे अपेक्षित असताना २८ ऑगस्टपर्यंत वेतन अदा केलेले नाही. ऑगस्ट महिन्याचे वेतन तीन दिवसावर आले असताना जुलै महिन्याचे वेतन थकले आहे. जुलै महिन्यातील काहींचे वेतन झाले असले तरी बहुतांश जणांचे वेतन झालेले नाही. शासनाकडून वेतन अनुदान मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.


















