राज्यातील २५ जिल्हा परिषदा, १८ महापालिकासंह दोन हजार १६४ नगरपरिषदा व नगरपालिका आणि २८४ पंचायत समित्यांची मुदत संपून अद्याप निवडणुका घेण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू नाही. प्रभाग रचना, आरक्षण व मतदार यादी अंतिम करण्यासाठी साधारणत: तीन महिने लागणार आहेत. दुसरीकडे लोकसभा निवडणूक एप्रिल २०२४ तर विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असल्याने ‘स्थानिक’ निवडणुका नोव्हेंबर २०२४नंतरच होतील, अशी सद्य:स्थिती आहे.
तत्पूर्वी, न्यायालयातील प्रभाग रचनेचा तिढा सुटावा लागेल.मागील लोकसभेची निवडणूक ११ एप्रिल ते १९ मे २०१९ या दरम्यान ७ टप्प्यांत झाली होती. तर ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. आता राज्यातील बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर मार्च २०२२ पासून प्रशासकराज असून दिवाळीनंतर निवडणुका होतील, अशी चर्चा आहे. माजी पदाधिकाऱ्यांसह नव्याने इच्छुक असलेल्यांचे त्याकडे लक्ष लागले आहे.