पुणे, 26 जुलै (हिं.स.)। पुणे जिल्ह्यातील टाटा समूहाच्या सहा धरणांव्यतिरिक्त उर्वरित २६ धरणांमधील एकूण उपलब्ध पाणीसाठा ८४.२२ टीएमसी इतका झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा ६.५५ टीएमसीने वाढला आहे. गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला पाणीसाठा ७७.६७ टीएमसी इतका होता.
जिल्ह्यात एकूण ३२ धरणे आहेत. यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या सुमारे पावणेदोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची घसरलेली पातळी आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण उपलब्ध पाणीसाठा ४२.४६ टक्के झाला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सकाळी आठपर्यंत २०.२७ टीएमसी (६९.५२ टक्के) पाणीसाठा झाला आहे.
दरम्यान, खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत गेल्या २४ तासांत (बुधवारी सकाळी आठपासून गुरुवारी सकाळी आठपर्यंत) ३.७१ टीएमसी पाणी जमा झाले आहे. सध्या ‘खडकवासला’ प्रकल्पांतील चारही धरणांमधील मिळून एकूण उपलब्ध पाणीसाठा आता २०.२७ टीएमसी इतका झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून गेल्या वर्षीच्या जुलैच्या २५ तारखेला १७.८४ टीएमसी (६१.१९ टक्के) इतका पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये २.४३ टीएमसी (८.३३ टक्के) अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.