मुदखेड ता प्र
मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील युवा शेतकरी बापूराव भीमराव कस्तुरे (वय ४८) यांनी कर्जबाजारीपणाच्या जाचास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेतकरी असलेल्या बापूराव भीमराव कस्तुरे यांच्यावर विविध बँकांचे कर्ज होते. कर्जबाजारीपणा, सततची नापिकी, शेतमालास नसलेले अपेक्षित भाव यामुळे दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि उदरनिर्वाहासाठी निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी यामुळे नैराश्यात जाऊन स्वतःच्या शेतात जाऊन आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यामुळे बापूराव चिंतेत होते तसेच मुलीच्या लग्नाच्यावेळी शेतीही विकावी लागली होती.
सध्या महाराष्ट्रात दररोज अर्धा डझनहुन अधिक शेतकरी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहेत. आठ दिवसांपूर्वी मुदखेड तालुक्याच्या बाजूला असलेल्या अर्धापुर तालुक्यातीलही एका युवकाने आत्महत्या केली होती. या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत, तसेच सोयाबीन व इतर पिकांना भाव नसल्याने, पीकविमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. सरकारने आवश्यक पाऊले उचलली नाहीतर शेतकऱ्यांना कोण वाचवणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.