करकंब प्रतिनिधी :- शनिवारी दुपारनंतर एकामागून एक पालखी सोहळे लाडक्या विठुरायाच्या पंढरपूर तालुक्यासह करकंबनगरीत दाखल होत असताना लाखो वैष्णवांनी केलेल्या विठुनामाच्या गजराने अवघी करकंबनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.दरम्यान टेंभुर्णी रोडवरील मुकुंद व्यवहारे यांच्या शेतात दुपारी २.३० वाजता पार पडलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगणाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.तेथे माऊली माऊलीच्या जयघोषात प्रथम अश्वाने रिंगण पूर्ण केले.त्यापाठोपाठ भगवे पताकाधारी भाविक,तुलसीवृंदावन घेतलेल्या महिलाभाविक,टाळकरी,विणेकरी,
यांनी विठुरायाच्या धावा करत ढगाळलेल्या आल्हाददायक वातावरणात रिंगण पूर्ण केले. विठुरायाच्या तालुक्यात प्रवेश करताना उत्साह द्विगुणित झालेल्या वारकऱ्यांनी याठिकाणी अध्यात्मिक खेळांचा मनमुराद आनंद लुटला.सदर पालखीचे करकंब नगरीत जिल्हा वनाधिकारी धैर्यशील पाटील,गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी स्वागत केले. जवळपास ७० हजार भाविक असणारी संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पालखीतळावर विसावली.दुपारी १च्या सुमारास संत नीळोबारायांच्या पालखीने ३०हजार भविकासह करकंब हद्दीत प्रवेश केला.
गावातील प्रदक्षिणा मार्गावरून सदर पालखी मोडनिंब रोडवरील सिद्धनाथ मंदिरात विसावली.अरण मार्गावरून संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळाही करकंबमध्ये दाखल झाला.जनार्धनस्वामी पालखी सोहळा दुपारी व्यंकटेश व्यवहारे यांच्या घरी थांबला होता.तर मुक्काम भजलींग महाराज मठात होता स़ंत एकनाथ महाराज पालखी सोहळा टिळक चौक येथे मुक्कामास असतो.करकंब व पंचक्रोशीत विठ्ठल नामाच्या गजरात.. वैष्णवांचा मेळा जमल्याने अवघी करकंब नगरी दुमदुमली होती.
चौकट.
करकंब व पंचक्रोशीत अनेक संतांच्या पालख्या व लहान मोठ्या दिंड्या येत असल्याने करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी मार्गावर व पालखी तळावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.