मंगळवेढा – तांडोर येथील भीमानदी पात्रातून अवैधरित्या वाळू भरुन जाणारा छोटा हत्ती महसूल विभागाने जप्त केला असून अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,तांडोर येथील भीमा नदी पात्रातून बिगर नंबरचा टाटा एन्ट्रा कंपनीचा छोटा हत्ती दि.6 रोजी रात्री 1.30 वाजता बेकायदा 2 हजार 375 रुपये किंमतीची अर्धा ब्रास वाळू घेवून जात असताना ग्राम महसूल अधिकारी संदीप विलास पवार (रा.अजनाळे) यांनी पकडून छोटाहत्तीसह 2 लाख 52 हजार 375 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन पोलीसांच्या ताब्यात दिला आहे. सदर वाहनाचा चालक अंधाराचा फायदा घेवून त्याच्या ताब्यातील टाटा एन्ट्रा कंपनीचा छोटाहत्ती जागीच सोडून पळून गेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास बोराळे बीटचे पोलीस हवालदार मनोज खंडागळे हे करीत आहेत.
दरम्यान भीमा नदी पात्रातील पाणी कमी झाल्यामुळे वाळू तस्करवाले रात्रीच्याला वाळू उपसा करुन त्याची विक्री करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. महसूल व पोलीस प्रशासन यांनी यापुढे डोळ्यात तेल घालून वाळू चोरी रोखून संबंधीतावर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे. सदर वाहनावर मागे व पुढील बाजूस दोन्ही ठिकाणी नंबर नसल्याचे निदर्शनास आले. वाळू चोरीच्या वाहनाला आत्तापर्यंत अनेक वेळा बिगर नंबरची वाहने वापरल्याचे उघड होत असताना सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन विभाग नंबर नसलेल्या वाहनावर का कारवाई करत नाही? हे आश्चर्यजनक असल्याचा बोलबाला सुरु आहे. मोटर सायकलवर पुढील किंवा मागील एका बाजूस नंबर नसल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस ऑनलाईन दंड आकारतात, वाळूच्या वाहनावर अशी कारवाई का केली जात नाही? ही चिंताजनक बाब असल्याचे समोर येत आहे.



















