सोलापूर : रेल्वे स्थानकासमोरील पोस्ट कार्यालयात आधार कार्ड अपडेटसाठी आलेल्या दोघां संशयितांना सदर बझार पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ते दोघे बांगलादेशी आहेत की पश्चिम बंगाल येथील पोलिसांकडून खात्री केली जात आहे. हे दोघे नेमके घुसखोर आहेत की आपल्याच देशातील याची खात्री करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी सांगितले.
सोमवारी दुपारच्या सुमारास रेल्वे स्टेशनसमोरील पोस्ट कार्यालयातील आधार केंद्रात दोघे संशयित आधार अपडेटसाठी आले होते. त्यांच्याकडील आधार आणि त्यावरील पत्ता तसेच त्यांच्या हालचाली संशयित वाटल्याने ही बाब पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर सदर बझार पोलिसांनी त्या दोघांना पोस्टातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील आधार कार्डवरील माहिती तपासली असता, त्यावर ते पश्चिम बंगाल येथील पत्ता नमूद आहे. परंतु त्यामध्ये काही गडबड करून तो पत्ता बदलला आहे का? ही बाब तपासली जात आहे.
दरम्यान, मोहोळ तालुक्यातील कामावर एका ठेकेदाराने बाहेरून 25 मजूर आणले आहेत. त्यातील हे दोन मजूर सोलापुरात आले, असल्याचेही सांगितले जात आहे. तो मक्तेदार कोण आहे, त्याच्याही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. अलीकडील काही दिवसांपूर्वी सोलापुरातून दशहतवादी संघटनेशी संबंधित संशयितांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर इतर दोघां संशयितांना ताब्यात घेतले होते. आता ताब्यात घेतलेल्या संशयितांचा कोणत्या संघटनेशी संबंध आहे का, कि ते खरेच मजूर म्हणून सोलापुरात आणले गेलेतं, यातील सत्य चौकशीनंतर बाहेर पडणारं आहे.

















