सोलापूर – डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी मनिषा मुसळे-माने हिने खटल्यातून दोषमुक्त होण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर सरकार पक्षाने आक्षेप घेतला आहे. या दोषमुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी दि.२१ नोव्हेंबर पुढील तारीख दिली आहे. त्यामुळे याप्रकरणी सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, मनीषा मुसळे माने हिचेमार्फत डॉक्टर शिरीष वळसंगकर, फिर्यादी व इतर साक्षीदार यांचे घटनेपूर्वी ५ महिन्याचे सीडीआर व टॉवर लोकेशन न्यायालयात सादर करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर सरकार पक्षाने म्हणणे दाखल केले आहे, त्याबरोबर तपास अधिकाऱ्याचे म्हणणे देखील सादर करण्यात आले आहे. सरकार पक्षाच्या म्हणण्यानुसार. तपास अधिकारी यांनी अर्जात नमूद सर्व साक्षीदारांचे सीडीआर व एसडीआर मिळवण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. सदर सीडीआर व एसडीआर प्राप्त होताच ते न्यायालयात सादर करण्यास तयार आहेत. असे म्हणणे मांडून सदर अर्जास देखील तीव्र हरकत घेतली असून अर्ज फेटाळण्याची विनंती केली आहे.
मनीषा मुसळे माने हीचा मोबाईल तपासावेळी पोलिसांनी जप्त केला होता. तो मिळण्यासाठी मनीषा हिने दाखल केलेल्या अर्जावर आज रोजी सरकार पक्षाने म्हणणे दाखल केले असून मनीषा मुसळे माने हिस तिचा मोबाईल देण्यास सरकार पक्षाने हरकत घेतलेली आहे. या तीनही अर्जावर दि.२१ नोव्हेंबर ही तारीख नेमण्यात आलेली आहे. यात मनीषा मुसळे माने हिचे तर्फे ऍड प्रशांत नवगिरे तर सरकारतर्फे प्रदीप सिंग राजपूत हे काम पाहत आहेत.

















