जेरुसलेम, २१ नोव्हेंबर (हिं.स.) : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि माजी संरक्षण मंत्री योव्ह गॅलंट यांच्यावर इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने (आयसीसी) युद्ध गुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गंभीर आरोपांसाठी अटक वॉरंट जारी केले आहे.
गाझा पट्टीत युद्धकाळात सामान्य नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांसाठी आयसीसीने नेतान्याहू आणि गॅलंट यांच्यावर हत्या, शोषण आणि अमानवीय कृत्यांबद्दल गुन्हे दाखल केले आहेत. इस्रायलने गाझातील नागरिकांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय सुविधा रोखल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू आणि संकटांना सामोरे जावे लागल्याचे आरोप आहेत. यात लहान मुलांचा मृत्यू आणि मानवीय त्रासाचे पुरावे आढळल्याचे कोर्टाने नमूद केले आहे.
आयसीसीच्या अहवालानुसार, नेतान्याहू यांनी जाणूनबुजून सामान्य नागरिकांना लक्ष्य बनविले, याबाबतचे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत.
दरम्यान, गाझातील युद्धबंदीबाबत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. हमासचे गाझा प्रमुख खलील अल-हय्या यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत युद्धबंदी होत नाही, तोपर्यंत कैद्यांची अदलाबदल होणार नाही. अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विनाअट युद्धबंदी प्रस्तावावर व्हेटो लावला आहे. मात्र, ओलीसांची सुटका करणाऱ्या प्रस्तावाला अमेरिकेने समर्थन दिले आहे.
गाझा संघर्ष आणि आयसीसीच्या या कारवाईमुळे इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. नेतान्याहू आणि गॅलंट यांच्यावर पुढील कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव वाढत आहे.