सोलापूर – गोरक्षकावर कसाईने थेट पोलिसांच्या समोर काठी व दगडांनी हल्ला केल्याची गंभीर घटना मोहोळ तालुक्यात घडली असून या प्रकरणी अखिल भारत कृषी गोसेवा संघ व गोरक्षकांच्या वतीने सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम यावालकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
गाई व बैल कत्तलीसाठी आणून बांधून ठेवल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र घटनास्थळी पोहोचताच संबंधित कसाईने गोरक्षकांवर काठी व दगडांनी प्राणघातक हल्ला केला. याच वेळी गोरक्षकांची गाडीही फोडण्यात आली. हे सर्व प्रकार पोलिसांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत घडले असताना देखील पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
याशिवाय घटनास्थळी कोणतेही गाई-बैल नव्हते, असा खोटा अहवाल पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी वरिष्ठांना दिल्याचा आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणीही करण्यात आली. या संपूर्ण प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित कसाईविरुद्ध सरकारी कामात अडथळा कलम ३५३ अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सदर प्रकरणात त्वरित व कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर बहिरवाडे, गोसेवक अमित राऊत, शहर संघटक प्रसाद झेडंगे, गोरक्षक लतेश हिरवे, रुपेश बेलेराव व प्रमोद कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

























