सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने यांनी पुन्हा घर वापसीचे संकेत दिले आहेत. आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेसचे उमेदवार असतील तर पूर्ण ताकतीने त्यांचा प्रचार करून त्यांना विजयी करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
पृथ्वीराज माने युवा मंचच्या वतीने ब्रह्मदेव दादा माने इन्स्टिट्यूट या ठिकाणी दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले.
त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, सर्वजण काँग्रेस सोडून जात आहेत परंतु मी एकमेव आहे की काँग्रेसमध्ये येत असेल. लोकसभेसाठी स्थानिक उमेदवार असला पाहिजे. आपण जातीपतीच्या राजकारणावर निवडून देणे थांबावू, आपल्याला दररोज भेटणारा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून हवा आहे.महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण कांहीही असू द्या सोलापुरात आपण क्रांती घडवू असे सांगून आगामी लोकसभेसाठी प्रणिती शिंदे या उमेदवार असतील तर पूर्ण ताकदीने प्रचार करणार असल्याचा शब्द देताना शहरातील कार्यकर्त्यांशी बोलून दोन दिवसात प्रवेश करण्याचे संकेत दिले.