सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने प्रणिती शिंदे, तर भाजपने राम सातपुते यांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे सोलापुरात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते असा सामना रंगणार असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यासही सुरुवात केली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये लेटर वॉरही सुरू झालं आहे. असं असतानाच भाजपच्या एका इच्छुक उमेदवाराने थेट सोलापूरचा उमेदवारच बदलण्याची मागणी केली आहे. सोलापूरचा उमेदवार बदलून त्याऐवजी स्थानिक व्यक्तीला उमेदवारी द्यावी, असा आग्रह या इच्छूक उमेदवाराने धरला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
भाजप कार्यकर्ते आणि अनुसूचित जाती सेलचे माजी उपाध्यक्ष दिलीप शिंदे यांनी ही मागणी केली आहे. दिलीप शिंदे हे सोलापूरमधून लोकसभेसाठी इच्छूक आहेत. सोलापुरातील उमेदवार बदला अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. माढ्यातील भाजपचा उमेदवार बदला ही मागणी जोर धरत असताना आता सोलापूरचाही उमेदवार बदलण्याची मागणी पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या ऐवजी सोलापूरच्या स्थानिक व्यक्तीला उमेदवारी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच दिलीप शिंदे यांनी थेट मागणी केल्याने या मागणीला आणखी बळ मिळालं आहे.