*बजाजनगरातील मुख्य चौकांत मोकाट जनावरांचा ठिय्या*
*गंभीर अपघात होण्याची शक्यता*
* संजय निकम
वाळूज महानगर (प्रतिनिधी)
बजाजनगर परिसरातील प्रत्येक रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायत अथवा एमआयडीसी कडे कोणत्याच उपाययोजना नसल्याने त्यांचा बंदोबस्त होत नाही त्यामुळे मोकाट जनावरे रस्त्यावर दिसून येत असून, त्याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या मोकाट जनावरांनी आपल्या मागण्यासाठी जणू काही मुख्य चौकामध्ये ठिय्या आंदोलन केल्याचे चित्र दिसून येत आहे.
मोहटादेवी परिसर, भाजी मंडई परिसर, वडगाव तिसगाव मुख्य रस्ता, वडगाव साजापूर रस्ता, महाराणा प्रताप चौक, मोरे चौक, जय भवानी चौक आदी परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. या सर्वच मार्गावर बऱ्याच शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी व पालकांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे ग्रामपंचायतीने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. जनावरांच्या उपद्रवामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. ही जनावरे मुख्य चौक पाहून त्या ठिकाणी आपला ठिय्या मांडतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
अपघाताची भीती बजाज नगर परिसरात वेगवेगळ्या भागात मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत असतात. तसेच, रस्त्याच्याकडेला बसलेली दिसतात. रस्त्याच्याकडेला बसणाऱ्या या प्राण्यांना प्राणीप्रेमी खायलाही आणून देतात.
तर, काही खासगी मालकांच्या गायी, बैलही रस्त्यावर फिरताना दिसतात. मोकाट जनावरांबाबत ग्रामपंचायत ने उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबवले जात असून, शहर सुंदर कसे दिसेल याबाबत सर्वसामान्य नागरिकांना सूचना केल्या जात आहेत. प्रत्यक्षात उपाययोजना प्रभावीपणे का होत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. अनेक खासगी मालक आपल्या गायी-बैलांना सरळ रस्त्यावर सोडून देत असल्याने त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.