तभा फ्लॅश न्यूज/अहिल्यानगर : गणेशोत्सव हा देशभरात जल्लोषात साजरा होणारा सण आहे. महाराष्ट्राला या उत्सवाची मोठी परंपरा लाभली आहे. यंदाच्या वर्षी राज्य शासनाने गणेशोत्सव ‘राज्योत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी हा गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.
श्री गणेशोत्सव २०२५ च्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी डॉ. आशिया बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे आणि पोलीस उपअधीक्षक वैभव कलबुर्गी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. आशिया म्हणाले, गणेशोत्सव साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी. गणेश मंडळांनी देखावे व सजावट करताना शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवर आधारित देखावे तयार करावेत. याबाबत शासनामार्फत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, सर्व मंडळांनी त्यात सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
















