तभा फ्लॅश न्यूज : केंद्र सरकारने देशातील २५ ओटीटी ॲप्सवर बंदी घातली आहे. बंदी घालण्यात आलेल्या ओटीटी ॲप्समध्ये उल्लू, एएलटीटी आणि डिसिफ्लिक सारख्या काही मोठी नावे समाविष्ट आहेत. माहिती प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भात एक अधिसूचनाही जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की या निर्णयाचा मुख्य उद्देश अश्लील सामग्रीचा प्रसार रोखणे हा आहे. अशी सामग्री भारतीय कायदेशीर आणि सांस्कृतिक मानकांचे उल्लंघन करणारी मानली जातात.
सरकारने इंटरनेट सेवा प्रदात्यांना भारतात या वेबसाइटवर सार्वजनिक प्रवेश थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. या अश्लील ॲप्सवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागतच होत आहे. केवळ या २५ ॲप्सवरच नाही तर यासारख्या ज्या ज्या ॲप्सवर अश्लीलतेचा नंगानाच चालू आहे अशा सर्वच ॲप्सवर सरकारने बंदी घालायला हवी. याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू असणाऱ्या सर्वच अश्लील वेबसिरिजवर देखील बंदी घालायला हवी.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर चालू असलेल्या अश्लील वेबसिरिज समाजाचा समतोल बिघडवत आहेत. या वेबसिरीज मोबाईलवर पहायला मिळत असल्याने अल्पवयीन मुलेही या वेबसिरीज चवीने पाहत असतात. वेबसिरिजसाठी सेन्सॉरबोर्ड नसल्याने यात काहीही दाखवले जाते. आक्षेपार्ह, अश्लील, लोकांच्या भावना दुखावणारे, भावना चाळवणारे, हिंसेला, व्यसनाला प्रोत्साहन देणारे असे सर्व ज्यांच्यावर सर्वसाधारण स्थितीत बंदी घातली जाऊ शकते किंवा प्रौढांसाठी म्हणून बिरूद लावले जाऊ शकते असे सर्वकाही दाखवले जाते. सेन्सॉरबोर्ड नसल्याने निर्माते दिग्दर्शक आक्षेपार्ह दृश्ये दाखवतात. वेबसिरिजना चित्रपटासारखे स्वतंत्र सेन्सॉरबोर्ड लागू केले तर या गोष्टींना आळा बसेल.
Post Views: 13