सोलापूर शहर व हद्दवाढ भागात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय व नासाडी करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दंड न भरल्यास त्याची वसूली करण्याबाबत कर आकारणी कार्यालयास कळविण्यात यावे, असे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी परिपत्रकाद्वारे काढले आहेत. सोलापूर शहर व हद्दवाढ भागात ज्या दिवशी पाणीपुरवठा होत असतो. त्या दिवशी नागरिकांकडून पिण्याचे पाणी जास्त प्रमाणात वाया जात असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आल्याने येणाऱ्या काळात जे कोणी पिण्याचे पाणी, कपडे धुणे, भांडे, दुचाकी, चार चाकी वाहने स्वच्छ करणे, रस्त्यावर पाणी मारणे अनावश्यकपणे पाणी वापरतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सोलापूर शहर आणि हद्दवाढ भागात सोलापूर महापालिकेमार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. चालू हंगामात राज्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाल्याने उजनी धरणात व हिप्परगा तलावात पाण्याची पातळी कमी असल्याने उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने करुन येणाऱ्या उन्हाळयातील पाणीपुरवठा सुरळीत राहणे गरजेचे आहे. शहर व हद्दवाढ भागातील नागरीकांकडून, मिळकतधारकांकडून ज्या दिवशी ज्या परिसरात पाणीपुरवठा सुरु असतो त्या दिवशी तेथील रहिवाशाकडून कपडे धुणे, भांडे, दुचाकी, चार चाकी वाहने स्वच्छ करणे, रस्त्यावर पाणी मारणे इत्यादिसाठी अनावश्यकपणे पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. रस्त्यावर पाणी मारल्याने रस्ता नादुरुस्त होवून रस्त्यावर खड्डे पडत आहेत व पाणी उताराच्या दिशेने वाहून डबका तयार होवून पाणी साचून अनारोग्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत सर्व विभागीय अधिकारी व उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन यांच्या अधिपत्याखालील सर्व आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक यांना तसे कारवाईचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. पिण्याचे पाणी अपव्यय व नासाडी करणाऱ्या नागरिकांवर बिनचूक दंडात्मक कारवाई करावी व तसा अहवाल महापालिकेकी सादर करावा. दंड न भरल्यास त्याची वसूली करण्याबाबत कर आकारणी कार्यालयास कळविण्यात यावे, असे महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी परिपत्रकात म्हटले आहे.