दिल्ली – सनातन संस्थेने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत दिल्ली येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित केला होता. या निमित्ताने देशभरातील विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरातून हजारो हिंदुत्वनिष्ठ येणार असल्याने त्यांच्या समोर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या संकल्पनेनुसार ‘वंदे मातरम’चा गौरव व्हावा, या दृष्टीने सनातन संस्थेने वंदे मातरम् गीताचे भव्य प्रदर्शन तीन दिवस भारत मंडपमच्या शेजारील हॉल क्र. १२ मध्ये आयोजित केले होते. तसेच मुख्य कार्यक्रमात वंदे मातरमचे समूह गान आयोजित केले होते. त्याचबरोबर या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक शस्त्रे होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. मंत्र्यांच्या हस्ते करण्याचे निश्चित झाले होते आणि त्यासाठी नियमित शासकीय पद्धतीने आम्ही शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार सर्व प्रशासकीय मान्यता घेऊन शासनाने त्याला मान्यता दिली. या व्यतिरिक्त उर्वरित कार्यक्रम हा सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाचा होता आणि त्याचे नावच ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ असे होते, त्यामुळे त्याला हिंदू राष्ट्राचा महोत्सव म्हणून खोटा प्रचार काँग्रेसकडून केला जात आहे, असे उत्तर सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिले आहे.
सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. वर्तक पुढे म्हणाले की, या कार्यक्रमात कोणतेही भारतीय संविधान विरोधी भाषण झाले नाही. सर्व वक्त्यांनी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांची बाजू मांडली आणि त्यावर उपाययोजना सांगितल्या. प्रत्यक्षात कांग्रेसचे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री घटनात्मक पदावर असताना “कांग्रेस मतलब मुस्लिम और मुस्लिम मतलब कांग्रेस” अशी घटनाविरोधी घोषणा करतात, काँग्रेसचे तत्कालीन प्रधानमंत्री “इस देश की साधनसंपत्ती पर पहिला अधिकार मुसलमानो का है”, असे वक्तव्य करतात. सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा नाकारूनही धर्माच्या आधारावर मुस्लिम समाजाला आरक्षण घोषित करतात, केरळमध्ये काँग्रेसचे नेते बीफ बैन ला विरोध करण्यासाठी रस्त्यावर गोहत्या करतात, हे सर्व संविधान विरोधी नाही का? त्यामुळे काँग्रेसने अगोदर स्वतःची पापे बघावीत.
काँग्रेसने केलेले शिखांचे हत्याकांड आजही लोक विसरलेले नाहीत, तसेच बाटला हाऊसच्या आतंकवाद्यांसाठी अश्रू काढणे, मुंबई येथील २६/११च्या आतंकवादी हल्ल्यात कसाब आदी पाकिस्तानी आतंकवादी सहभागी असल्याचे पुरावे असताना कांग्रेसचे नेते “२६/११ का हमला RSS की साझिश” या रा. स्व. संघाला दोषी ठरवणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहतात.
काँग्रेसचे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तर आता जाहिरपणे कबूल केले आहे की, मी हिंदू आतंकवाद शब्दाचा वापर करायला नको होता, मात्र पक्षाने सांगितले म्हणून केला. त्यांना ही हिंदूंना आतंकवादी ठरवण्याची थियरी कोणी सांगितली होती, याचा खुलासा कांग्रेस पक्ष का करत नाही? याच थियरीच्या आधारे सनातन संस्थेला ही खोट्या प्रकरणांत गोवण्यात आले होते. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे; मात्र कोणत्याही प्रकरणात न्यायालयाने सनातन संस्थेला दोषी ठरवलेले नसतानाही, आम्हाला आतंकवादी संबोधणाऱ्या कांग्रेसच्या नेत्यांवर, तसेच संबंधित पोर्टलवर आम्ही बदनामीचे खटले दाखल करणार आहोत, असेही श्री. वर्तक यांनी म्हटले आहे.



























