लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर घोटाळ्याचे आरोप केले आहेत.
आदिवासी मुलांसाठी असलेल्या आश्रम शाळेत दुधामध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. आ. पवार यांनी हे आरोप पत्रकार परिषद घेऊन केले आहे. एका अज्ञात व्यक्तीने माझ्या ऑफिसमध्ये या घोटाळ्याबाबत कागदपत्रे आणून ठेवल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना आ. रोहित पवार म्हणाले, सत्तेत असणाऱ्याच कुठल्यातरी नेत्याने माझ्या ऑफिसला फाईल पाठवल्या आहेत. अशा ११ फाईल आहेत. आता मी ११ पैकी दोन फाईल आणल्या आहेत, इतर फाईलपेक्षा या फाईलचा आकडा लहान आहे. पहिल्या फाईलमध्ये दूध घोटाळ्याची माहिती आहे. राज्यात ५५२ आश्रम शाळा आहेत. तेथील मुलांच्या आरोग्यासाठी दररोज दूध मिळण्याचा जीआर काढला आहे. या शाळेत एकूण विद्यार्थी १ लाख ८७ हजार आहेत. एखाद्या संस्थेला दूध पुरवठा असेल तर त्याासाठी कॉन्टक्ट दिले जाते, याबाबत करार आहेत. पहिल्या करारात अमुल, चितळेकडून दूध घ्यायला हरकत नाही असं यात म्हटले आहे. जेव्हा २०१८-१९ मध्ये करार झाला होता तेव्हा ४६.४९ रुपये लीटर असा दर होता, दुसऱ्या एका टेंडरमध्ये अमुलसाठी४९. ७५ रुपये करार झाला होता. २३-२४ मध्येही तसेच टेंडर काढले हे टेंडर १६४ कोटींचे टेंडर आहे, यात ५ कोटी ७१ लाख पॅकेट्स घ्यायचे होते. २०२३-२४ मध्ये १४६ रुपये प्रतिलिटर दराने कंत्राटदारास पैसे देण्यात आले आहेत.