वैराग – वैराग-बार्शी रोडवर आज सकाळी एका थरकाप उडवणाऱ्या भीषण अपघातात माणेगाव येथील आजोबा आणि त्यांच्या दोन वर्षांच्या नातवाला आपला जीव गमवावा लागला. भरधाव वेगातील टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामुळे दुचाकीने क्षणार्धात पेट घेतला आणि या आगीत होरपळून दोन वर्षांच्या शंभू पाखरेचा जागीच मृत्यू झाला.
काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, माणेगाव येथील दत्तात्रय पाखरे हे आपला दोन वर्षांचा नातू शंभू भारत पाखरे याला घेऊन दुचाकीवरून वैरागहून आपल्या गावी परतत होते. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते वैराग-बार्शी रोडवरील छत्रपती कार केअर समोर आले असता, समोरून येणाऱ्या भरधाव टिप्परने अचानक आपली लेन सोडून त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरात धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर दुचाकी रस्त्यावर कोसळली आणि क्षणार्धात दुचाकीने पेट घेतला. या दुर्घटनेत दुचाकीवरील आजोबा दत्तात्रय पाखरे आणि चिमुकला नातू शंभू दोघेही भाजले गेले. दुर्दैवाने, चिमुकला शंभू याचा जागीच मृत्यू झाला.
उपचाराअभावी आजोबांची प्राणज्योत मालवली
अपघातानंतर गंभीर जखमी झालेले दत्तात्रय पाखरे यांना मदत मिळण्यास उशीर झाला. घटनास्थळाजवळ प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होऊ न शकल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्थानिकांनी त्यांना खासगी वाहनातून रुग्णालयाकडे रवाना केले, मात्र उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. “जर वेळेवर उपचार मिळाले असते, तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता,” अशी खंत प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त करत प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पाखरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
पाखरे कुटुंबात दोन मुलींनंतर शंभूचा जन्म झाला होता, त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, या भयानक अपघाताने त्यांच्या आनंदावर काळाने घाला घातला आहे. एकाच घरातील दोन सदस्यांचा अशा पद्धतीने अंत झाल्याने माणेगाव आणि परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
टिप्पर चालक फरार
अपघातानंतर टिप्पर चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला. मात्र, उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखत टिप्परचा वाहन क्रमांक पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, टिप्परचा वेग अत्यंत जास्त होता. या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, पोलीस फरार चालकाचा कसून शोध घेत आहेत.




















