तभा वृत्तसेवा
टेंभुर्णी / प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षा विषयी योग्य दिशा,सातत्यपूर्ण प्रशिक्षण, व पायाभूत सुविधांची मदत मिळाल्यास ग्रामीण भागातील मुलांना निश्चितच यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्यास अडचण येणार नाही त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय निश्चित करून मार्गक्रमण केल्यास यश तुमच्या पदरात पडणार यात काही शंका नसल्याचे प्रतिपादन ,शरद पवार गटाचे युवा नेते सुनील बनकर यांनी केले.
जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथील अतिशय हालाखीची परिस्थिती असलेल्या ऋषीकेश बनकर, सिद्धेश्वर निलक या दोन मुलांची पोलिसांत निवड झाली त्या अनुषंगाने गावकऱ्यांच्या वतीने या दोन्ही युवकांचा सत्कार सभारब आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,जाफराबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील तरूणांनी राजकारणात न जाता शिक्षणाच्या माध्यमातून आपली व आपल्या गावाची ओळख निर्माण करावी, गावातील इतर तरुणांनी या दोघांचा आदर्श घेऊन त्या पद्धतीने आपला सराव सुरू ठेवावा. आजच्या घडीला अनेक होतकरू तरुण सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकून आपलं भविष्य खराब करत आहेत,आपला जीवनाचा उद्देश कोणता ,आपण काय करतो ,अशा इतर बाबीचा विचार करून आपलं ध्येय साध्य करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. यावेळी शिवाजी पंडित, ग्रामपंचायत सदस्य संतोष हिवाळे,अर्जुन निलक,गणेश निलक,राम पाटोळे,ज्ञानेश्वर बनकर,परशराम कापसे,आदी गावकऱ्यांची मोठया प्रमाणावर उपस्थिती होती.