जमिनीच्या वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. दरम्यान गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांवर आता ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
द्वारली येथे राहणार्या मधुमती ऊर्फ नीता जाधव यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आमदार गणपत गायकवाड यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारिक, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, मंगेश वारघेट यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीत फिर्यादी धुमती ऊर्फ नीता जाधव यांनी म्हटले आहे की, माझे सासरे नामदेव जाधव यांच्या नावावर सर्व्हे क्र. 6 ही जमीन असून त्याबाबत गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. या जागेवर बांधकामांचे साहित्य देखील आणून ठेवले आहे. त्यांच्या कुटुंबाने थेट महसूल मंत्रालयाकडे अपिल केले असून त्याचा अद्यापि निकाल लागलेला नाही. तरीदेखील गणपत गायकवाड व त्यांचे साथीदार यांनी ३१ जानेवारी रोजी द्वारली येथे जाऊन जमीनमालकांना दमदाटी केली. एवढेच नव्हे तर फावडे हातात घेऊन हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. यावेळी गायकवाड यांनी जातीवाचक वक्तव्ये करून धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
द्वारली येथील जमिनीचा वाद हिललाईन पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र मांडवली न झाल्याने आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्येच केवळ तीन फुटांवरून शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर बेछूट गोळीबार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही थरारक घटना घडल्यानंतर गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणे व संदीप सरवणकर यांना त्वरित अटक करण्यात आली.