भंडारा, 26 जुलै (हिं.स.) – मागील अनेक दिवसांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेले माजी खासदार शिशुपाल पटले यांनी अखेर भाजपला रामराम केला आहे. त्यांनी २४ जुलैला आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला. या मुळे आधीच विवंचनेत असलेल्या भाजपला भंडारा गोंदिया जिल्ह्यात गळती सुरू झाली आहे.
शिशुपाल पटले यांनी २००४ मध्ये लोकसभा निवडणूकीत प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात पोवार समाजाचा मोठा चेहरा मानले जातात. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले यांनी दिलेला राजीनामा भंडारा भाजपसाठी सुद्धा मोठे धक्का मानला जातो.
शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारकडे, पाठपुरावा करीत होतो, मात्र राज्यातील सरकारने व सत्तेत सहभागी असलेल्या पक्षनेतृत्वाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळेच तुमसर विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या प्रश्नासाठी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी स्पष्ट केले आहे.