तभा फ्लॅश न्यूज/ बदनापूर : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा क्र. २ अंतर्गत मराठवाड्यातील पहिले तालुकास्तरीय प्लास्टिक कचरा संकलन व प्रक्रिया केंद्र आज बदनापूर पंचायत समितीत कार्यान्वित झाले. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री व जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, “प्लास्टिक कचऱ्याचे वाढते प्रमाण ही गंभीर समस्या आहे. ग्रामीण भागात योग्य व्यवस्थापनाद्वारे स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व आरोग्य सुधारणा यासाठी बदनापूरातील हे केंद्र आदर्श ठरेल.”
या कार्यक्रमाला भाजप जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष व आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., माजी खासदार भास्कर दानवे, माजी आमदार भाऊसाहेब घुगे, बद्रीनाथ पठाडे, मुक्ताबाई गीते यांच्यासह अनेक मान्यवर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या केंद्राच्या माध्यमातून गावोगावी संकलित होणारा प्लास्टिक कचरा योग्य पद्धतीने प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जाणार असून ग्रामीण स्वच्छतेच्या चळवळीत बदनापूरने मराठवाड्यास नवा मार्ग दाखविला आहे.
















