राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन झाले आहे. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पुत्र आमदार अतुल बेनके, डॉ. अमोल, अमित, दोन भाऊ, तीन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जुन्नर परिसरात शोककळा पसरली आहे.
बेनके हे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. बेनके यांनी जुन्नर विधानसभा मतदार संघातून १९८५ ते २००९ या कालावधीत सलग सहा वेळा निवडणूक लढवली होती. त्यातील चार वेळा ते विजयी झाले होते. दरम्यान दोन निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी त्यांचा सलग दोन वेळा पराभव केला. त्यानंतर २००४ आणि २००९ साली ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. प्रकृतीमुळे २०१४ पासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते.
मागील बऱ्याच महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर रविवारी रात्री चाकण येथील खासगी रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव आज, सोमवारी नारायणगाव येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले असून दुपारनंतर हिवरे बुद्रुक (ता. जुन्नर) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वल्लभ बेनके यांचा जन्म २३ जून १९५० रोजी जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुक येथे झाला. शेती हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. स्पष्ट वक्तेपणा, धडाकेबाज नेता अशी बेनके यांची ओळख होती. शरद पवारांचे सहकारी म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. या कालावधीत त्यांनी आमदार म्हणून जुन्नरची सेवा करत तालुक्याचा विकास केला. धरणग्रस्तांसाठी त्यांनी दीर्घ लढा दिलेला आहे.