मुंबई, २९ जुलै (हिं.स.) : वरळीतील हिट अँड रनचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरळी सीफेस येथील एजी खान अब्दुल गफार खान रोडवर २० जुलै रोजी बीएमब्यल्यूनं एका तरुणाला मागून येणाऱ्या चारचाकीने धडक दिली होती. या अपघातात दुचाकीस्वार विनोद लाड (२८) गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विनोदवर नायर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मूळचा मालवण येथील रहिवासी असलेला विनोद ठाण्यात ट्रान्सपोर्ट कंपनीत पर्यवेक्षक पदावर कामाला होता. दुचाकीवरून खाली पडून विनोदच्या डोक्याला मार लागला होता. आठ दिवस विनोद मृत्यूशी झुंज देत होता. अखेर शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली. मोटरगाडी ठाण्यातील अत्तर व्यावसायिकाची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये व्यावसायिकाचा कौटुंबिक कार्यक्रम होता. त्यासाठी तो ठाण्याहून वरळीमध्ये आला होता. दरम्यान, अपघात घडला त्यावेळी व्यावसायिकाचा चालक किरण इंदुलकर चारचाकी चालवत होता, असं तक्रारीत म्हटलं आहे. विनोदचा चुलत भाऊ किशोर लाड याच्या तक्रारीवरून या प्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी वरळीत घडलेल्या हिट अँड रन अपघात प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला होता. आधी पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण आणि त्यानंतर वरळीतील हिट अँड रन, दोन्ही प्रकरणांमध्ये श्रीमंत लोकांचे कारनामे समोर आले होते. वरळीतील अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर, पुण्यातील अपघातात दोन इंजिनिअर्सचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता. दोन्ही प्रकरण हायप्रोफाईल होती.