सोलापूर – आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत तणाव ही गंभीर समस्या बनली असून, आत्मविश्वासाचा अभाव आणि मनावर उमटलेले संस्कार हे तणावाला सुमारे ९० टक्के कारणीभूत ठरत आहेत. तणाव दूर करण्यासाठी अंतर्मनातील स्वभावदोषांवर मात करणे आवश्यक असून, त्यासाठी स्वयंसूचना हे प्रभावी माध्यम आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
सनातन संस्थेच्या वतीने सोलापूर येथील सिंहगड इंजिनीरिंग कॉलेज पंढरपूर, सातारा संकुल- पंढरपूर, सिंहगड इंजिनीरिंग कॉलेज सांगोला, जिजाऊ प्रशाला, राजेश्वरी शाळा विनायकनगर, अक्कलकोट येथे शिक्षक, प्राध्यापक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी ‘ताण-तणावमुक्त जीवन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. १५० हून अधिक शिक्षक आणि कर्मचारी यांनी या सत्संगाचा लाभ घेतला.
या वेळी सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितले की, शिक्षकांवर अध्यापनासोबतच प्रशासकीय आणि अतिरिक्त कामांचा मोठा ताण असल्याने मानसिक तणाव वाढतो. हा तणाव कमी न झाल्यास विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या गुणवत्तेवर तसेच विद्यार्थ्यांच्या संस्कारांवर विपरीत परिणाम होतो. तणावमुक्त शिक्षकच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि चांगले संस्कार रुजवू शकतात. या प्रसंगी सनातन संस्थेचे हिरालाल तिवारी यांनी व्याख्यानाचा उद्देश सांगितला आणि श्री. राजन बुणगे यांनी स्वयंसूचना कशा तयार कराव्यात, याविषयी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाला सनातनच्या पूजनीय दीपाली मतकर यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.

















