सोलापूर – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून धारदार हत्यार पोटात खूपसून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी मध्यरात्री अकराच्या सुमारास घघडली.
यात युवराज नारायण आवले वय 40 राहणार बुधले गल्ली भवानी पेठ हे जखमी झाले आहेत. याबाबत आवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिपिन सुभाष घोडके राहणार काळी मशीद जवळ याच्यावर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. जखमी युवराज हा बांधकाम कामगार आहे. आरोपी बीपीन आणि युवराज हे दोघे मित्र असून त्या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
शुक्रवारी रात्री युवराजला आरोपीने दारू पिण्यासाठी पैसे मागितले पण युवराजने पैसे देण्यास नकार दिला, शिवाय दारू ही न पाजल्याने त्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीस, थांब तुला खल्लास करतो असे म्हणून त्याच्या जवळील हत्याराने पोटावर वार केले. तेव्हा युवराज याने हाताने अडविण्याचा प्रयत्न केला पण तरीही हत्यार पोटाच्या डाव्या बाजूस खूपसले त्यातून गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रविवारी दुपारी घटनास्थळावर फॉरेन्सिक टीमने भेट दिली. आरोपीचा शोध सुरू असून पथक रवाना झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी दिली.

















