सोलापूर, 26 जुलै (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील खंडाळीसारख्या गावात महिला बचत गटात तृतीय पंथीयांना सामावून घेण्यात आले आहे. या बचत गटाच्या सचिवपदाचा मान एका तृतीय पंथीयाला मिळाला आहे. या निवडीची सकारात्मक चर्चा माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात होत आहे. सूरज कांबळे असे बचत गटाच्या सचिवपदी निवड झालेल्या तृतीय पंथीयाचे नाव आहे. माळशिरस तालुक्यात यापूर्वी तरंगफळ गावच्या सरपंचपदी ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कांबळे या तृतीय पंथीयाची थेट सरपंचपदी निवड झाली होती. त्यानंतर एखाद्या महिला बचत गटात तृतीय पंथीयांना सामावून घेणे आणि त्यात सचिवपदी तृतीय पंथीयाची निवड होणे, ही आणखी आश्वासक बाब मानली जात आहे.
अलिकडे शासनाने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यापाठोपाठ माझा लाडका भाऊ योजनाही जाहीर केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी लाखो महिलांचे अर्ज भरले जात आहेत. परंतु अशा योजनांमध्ये तृतीय पंथीयांना कोणतेही स्थान मिळाले नाही. त्याची चर्चा खंडाळी गावात महिला बचत गटात उपस्थित झाली आणि त्यातून बचत गटात तृतीय पंथीयांना सामावून घेण्याचा विचार समोर आल्याचे बचत गटाच्या अध्यक्षा शाबेरा शेख सांगतात.