मंगळवेढा – भारतीय संस्कृतीत बहिण भावाच्या नात्याला एक वेगळे व अतुट स्थान असून नुकतेच दिवाळीचा भाऊबीजेचा सण मोठया उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात आला. मात्र मंगळवेढयाच्या ग्रामीण भागात राहणार्या एका 65 वर्षीय वृद्ध बहिणीला उपचार करावयास नेतो असा बहाणा करून चक्क पंढरपूर कुर्डूवाडी मार्गे जाणार्या रेल्वेत बसवून कुर्डूवाडी येथून तिघा भावानी पळ काढून त्या वृद्ध बहिणीला सोडून दिल्याची घटना घडली असून मात्र या वृद्ध महिलेच्या मदतीला मंगळवेढा पोलिस धावून आल्याने तिला मायेचा आधार मिळाला आहे.
हुन्नूर परिसरातील ऐका महिलेचे लग्न झाल्यानंतर सहा महिन्यात पतीने सोडून दिले. ती आपल्या माहेरी भावाकडे राहात होती. तिला मुलबाळ नसल्यामुळे ती एकटीच होती. ती वृद्ध महिला पडल्याने तिचा पाय घोटयाजवळ फ्रॅक्चर झाला होता. परिणामी तिला चालता येत नसल्यामुळे दुसर्याचा आधार घ्यावा लागत असे.
मागील दोन दिवसापुर्वी तिच्या सख्ख्या तीन भावानी तिला आयुर्वेदिक उपचारासाठी कुर्डूवाडी येथे घेवून जातो असे सांगून पंढरपूर येथून जाणार्या रेल्वेत चौघेजण बसून कुर्डूवाडीकडे निघाले. कुर्डूवाडी स्टेशन येताच त्या बहिणीला तेथे सोडून त्या तिघा भावानी गुपचुप पळ काढला. ही वृद्ध महिला रेल्वेत बसून होती. तिच्या ही घटना लक्षात आली नसल्याने ती रेल्वेत बसून राहिली. सोलापूर आल्यानंतर तिचे भाऊ दिसत नसल्याने तिने रेल्वेच्या दरवाजाजवळ उभे राहून दरवाजाचा आधार घेत खाली उतरली तेवढयात रेल्वे पोलिस तेथे उभा असल्याने त्यांनी हे दृश्य पाहून तिच्या जवळ जावून विचारपूस केली तेंव्हा त्या आजीने सर्व घटना कथन केली.
रेल्वे पोलिसानी सदर वृद्धेस रिक्षात बसवून सोलापूर बसस्थानकावर पाठवले. रिक्षा चालकानी त्या वृद्धेची हालत पाहून त्याने मोफत सेवा दिली. सोलापूर -पंढरपूर या बसने येवून ती रात्री 9 वाजता मंगळवेढा पोलिस स्टेशनमध्ये पोहचली. तिला चालता येत नसल्यामुळे पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हवालदार वंदना आहिरे (घोडके) यांनी तिच्या मदतीला धावून ठाणे अंमलदार जवळ नेले व त्या वृद्धेने सर्व कर्मकहाणी ठाणे अंमलदारला सांगितले. रात्री महिला पोलिस हवालदार हिने आपल्या घरातील भोजन देवून तिला कुटुंबाचा आधार दिला व रात्री तिने पालिस स्टेशनमध्ये मुक्काम केला. तसेच दुसर्या दिवशी सकाळी पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हुलजंती बीटचे पोलिस हवालदार कोष्टी यांनी तिच्या कुटुंबियाशी संपर्क साधून तिला सुखरूप त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर तिचा जीव भांडयात पडला.
एकीकडे बहिण भाऊ चे नाते हे अप्रतिम असते. असे सांगितले जात असतानाच व्हाटसप फेसबुकच्या जमान्यात संकटसमयी बहिणीला भावाला सांभाळणे मुश्किल बनत असल्याचे विदारक चित्र या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान त्या वृद्ध महिलेने जीवनाची कहाणी कथन करताना प्रसारमाध्यमाजवळ अक्षरशः अश्रू वाहिले.

















