मंठा पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करत दोन तासात घेतले ताब्यात
मंठा प्रतिनिधी :
पतीसोबत दुचाकीने जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दोन दुचाकीस्वरांनी पळ काढला. सदर प्रकरणाची मंठा पोलिसांना माहिती मिळतच मंठा पोलिसांनी व नागरिकांनी सदर लुटारूचा पाठलाग करून परतुर हद्दीत पकडले.याप्रकरणी शिवराज शहाजीराव सोळंखे यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलिसांनी दोन लुटारू विरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मंठा शहरातील घारे कॉलनी येथील शिक्षिका वंदना सोळंखे आपल्या पती व मुलीसह [ता.७] रविवार रोजी मंठा येथील तळणी फाट्यावरील एका मंगल कार्यालयात आयोजित साक्षगंध समारंभात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या.
या समारंभातून घरी परत येत असतांना मंठा-जालना महामार्गावरील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या समोर दोन अनोळखी तरुणांनी दुचाकीवर त्यांचा पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्याचे गंठण चालू गाडीमध्ये ओढून पळ काढला.यामुळे शिक्षिका वंदना सोळंखे गाडीवर पडून जखमी झाल्या आहेत.
यादरम्यान मंठा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, पो.हे.काॅ. एस.पी.राठोड , जगन्नाथ सुक्रे , मनोज काळे , आसाराम मदने , गायके यांनी आरोपींचा पाठलाग करत परतुर हद्दीत छत्रपती संभाजीनगर वाळूज परिसरात दोन संशयितांना ताब्यात घेतले. या घटनेत संशयित आरोपींनी वापरलेली दुचाकी चोरीची असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे.