जाकेर शेख यांची भोकर विधानसभा उमेदवारीची मागणी..!!!
अर्धापूर : लोकसभेतील यशानंतर विधानसभेसाठी महाविकास आघाडीतील अनेक घटक पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाला जनमत मिळाल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात राष्ट्रवादी उमेदवार उभे करणार असल्याने अर्धापूर नगरपंचायतचे नगरसेवक जाकेर शेख यांनी विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आगामी काळात स्वयंघोषित भावी..आमदारांना जबर हादरा बसण्याची शक्यता आहे.
भोकर विधानसभा मतदारसंघ हा नांदेड लोकसभेत येतो. नांदेड लोकसभा मतदारसंघातील भोकर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) पक्षाला सोडण्यात यावा आणि भोकर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी ही राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष, माहिती अधिकार संरक्षण समितीचे संस्थापकीय अध्यक्ष तथा नगरसेवक जाकेर शेख यांनाच देण्यात यावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठीकडे करणार असल्याची माहिती जाकेर शेख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अर्धापूर येथील बैठकीत दिली आहे. तर लोकसभा निवडणुकीत अर्धापूर शहरातील मतदार मोठ्या संख्येने महाविकास आघाडी च्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिल्याने वसंतराव चव्हाण यांच्या विजयात एक महत्वाची भूमिका जाकेर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस प्रेमी मतदारांनी निभावली, असा दावा जाकेर शेख यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते करत आहेत.
भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर, भोकर आणि मुदखेड या तीनही तालुक्यात जाकेर शेख यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांनी पक्षाच्या व संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केले आहे. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. सन २०२४ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षातील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे उमेदवार यांच्या पदरात यश पाडून घेतले. लोकसभेचा निकाल भोकर विधानसभा मतदार संघातील आगामी राजकारणाला निश्चितच कलाटणी देणारा ठरला असून, सत्ताधारी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना चिंतन करणारा ठरला आहे. पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्रित राजकारण या निवडणुकीत सरस ठरल्याचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. तर अल्पसंख्याक मतदार ‘किंगमेकर’ ठरला असून आगामी काळात अल्पसंख्यांक उमेदवारास भोकर विधानसभेची उमेदवारी द्यावी विजय निश्चितच होईल असे यावेळी सांगण्यात आले.
अर्धापूर शहरवासीयांचा सिंहाचा वाटा…
लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या विजयात अर्धापूर शहरवासीयांचा सिंहाच्या वाटा ठरला. लोकसभा निवडणुकीत शहरातून सर्वाधिक मतांची आघाडी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास मिळाली.
पक्षश्रेष्ठींनी समाजाच्या भावना समजून घ्याव्यात…
भोकर विधानसभा मतदार संघासह महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मतदार महाविकास आघाडी घटक पक्षांना मानणारा असून आगामी काळात अर्धापूर शहरातील युवा कार्यकर्ते जाकेर शेख यांना भोकर विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी मोठ्या संख्येने सामान्य नागरिकांतून व कार्यकर्त्यांमधून होत आहे. मी त्यांचा मुलगा आहे. माझी भावना वेगळी नाही पक्षश्रेष्ठींनी आमची दखल घ्यावी.
-जाकेर शेख
प्रदेशउपाध्यक्ष
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक (महाराष्ट्र राज्य)