मुंबई, २९ जुलै (हिं.स.) : मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू, पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या विद्यमान संचालिका डॉ. स्नेहलता देशमुख यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. स्नेहलता देशमुख या शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठात्या होत्या. १९९५ मध्ये त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक धडाडीचे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर त्या विद्यार्थ्याच्या किंवा विद्यार्थिनीच्या आईचे नावही लिहिणे.
डॉ. स्नेहलता देशमुख या लहान असल्यापासून हुशार होत्या. त्यांनी त्यांचे शिक्षण जिद्दीने पूर्ण केले. देशमुख या रांगोळी, एम्ब्रॉयडरी, ड्रॉईंग-पेन्टिंग गाणी सारख्या अनेक कलांमध्ये पारंगत होत्या. त्यांचे वडील डॉ. श्रीकृष्ण वासुदेव जोगळेकर हे प्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांनी शस्त्रक्रियेत पदवी मिळवली होती. त्यांनी मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय व के.ई.एम. रुग्णालय येथे अधिष्ठाता म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. स्नेहलता देशमुख या देखील त्यांच्या वडिलांप्रमाणे डॉक्टर झाल्या.
गर्भसंस्कार तंत्र आणि मंत्र, तंत्रयुगातील उमलती मने, अरे संस्कार संस्कार इत्यादी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना ‘डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार’, ‘धन्वंतरी पुरस्कार’, हे पुरस्कार मिळाले होते.