इमेजीन एंटरटेन्मेंट अँड मीडिया, अनंत नारायण महादेवन फिल्म्स यांच्या सहयोगाने ‘आता वेळ झाली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून इच्छामरणावर भाष्य करणारा हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग पार पडले. यावेळी नाना पाटेकर, डॅा मोहन आगाशे यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. नाना पाटेकर आणि डॅा. मोहन आगाशे यांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. सोबतच असे चित्रपट वरचेवर यावेत, तसेच प्रेक्षकांनीही ते पाहावेत, असे आवाहनही केले.
दिग्दर्शक अनंत महादेवन म्हणतात, ” इच्छामरणावर प्रत्येकाची वेगवेगळी मते आहेत. हा विषय सामाजिक, भावनिक आणि संवेदनशील आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दल येणाऱ्या प्रतिक्रिया, मते या अगदीच मिश्र असणार, हे मला ठाऊक होते. मात्र प्रेक्षकांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद बघून मला प्रचंड आनंद होतोय.”