दुध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रतिलिटर रु. ५ /-अनुदान देय आहे. पात्र पशुधनास कानात टॅगिंग (Tagging) करून भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी अत्यावशक आहे. दिनांक ५ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार सर्व पशुवैद्यकीय संस्था मार्फत पशुधनास टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. सदर पशुधनास टॅगिंग व नोंदणीस शेतकरी/ पशुपालक यांच्याकडून उत्स्पुर्त प्रतिसाद मिळत असून २४ जानेवारीपर्यंत खालीलप्रमाणे अतिरिक्त नोंदणी करण्यात आल्या. पशुधन नोंदणी – ५.७३ लक्ष, पशुपालक नोंदणी – १.९६ लक्ष, पशुपालक हस्तांतरण नोंदणी – ३.२० लक्ष, पशुधनाच्या नोंदीत बदल – १.८४ लक्ष, कानातील टॅग बदल नोंदी – ५७९५, पशुपालकांच्या नावातील बदल – ०.५० लक्ष. तसेच अतिरिक्त ५६ लक्ष टॅग नव्याने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
ठाणे जिल्ह्यामध्ये गोवर्गीय संख्या ७६ हजार असून त्यापैकी ७२ हजार जनावरांना टॅग करून त्याची प्रणालीवर यापूर्वीच नोंद करण्यात आलेली आहे. जर काही नवीन गोवर्गीय पशुधन टॅग करण्याचे राहून गेले असतील, तर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय याद्वारे ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन त्यांच्याकडे असलेल्या गोवर्गीय पशुधनास टॅग करून त्याची भारत प्रणालीवर नोंद करणे आवश्यक आहे.
दि. २४ जानेवारी रोजी मंत्री महोदयांनी व्हिसीद्वारे बैठक आयोजित करून सर्व जिल्हास्तरीय अधिकारी यांना पशुधनास टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करण्याचे कामकाज अभियान स्वरुपात राबविणे बाबत सूचित केले आहे. आपल्या सर्व पशुधनास टॅगिंग व ऑनलाईन नोंदणीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करून आपल्या पशुधनाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर यांनी केले आहे.